Saturday, September 19, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बिल्व पत्र , दूर्वा पत्र




बिल्व पत्र ( Aegle marmelos )


संस्कृत नाव- बिल्व, शाण्डिल्य (पीडा दूर करणारा)
मराठी नाव- बेल 
हिंदी नाव- बेल

संपूर्ण भारतात प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात, हिमालयात आढळणारा २५-३० फूट उंचीचा वृक्ष.
याला हिरवट-पांढरी सुगंधी फुले येतात. फळे,  कठीण २. ५ - ३  इंच व्यासाची सुंदर धुरकट पिवळसर रंगाची असतात.   

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
बेल   कषाय व  कडू रसाचे आणि  गुणधार्माने उष्ण  आहे. 
बेल विशेषतः वात-कफ  शामक आहे .
वातशमक असल्याने बेलाची पाने सूज व वेदना कमी करण्यास मदत करतात. वाताची वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या "दशमूळ" मधील बेल हे एक प्रमुख औषधी आहे. 
पचन  संस्थेच्या आजारांवर बेल फळाचा चांगला उपयोग होतो. 
१. कच्चे बेलफळ भूक वाढवणारे व पचन सुधारणारे आहे. ते ग्राही म्हणजे  अतिसार थांबवणारे व कृमिघ्न आहे . 
२. पिकलेले बेलफळ तुरट - गोड व मृदु रेचक आहे. 
३. बेलाच्या पानां च्या  रसाने यकृताचे कार्य सुधारून पित्ताचे विरेचन होते. 
४. खूप पिकलेल्या बेल फळाची मज्जा व खडीसाखर घेतल्यास  लगेचच  अतिसार व रक्तज अतिसार थांबतो. 
५. बेल, धणे , सुंठ व नागरमोथा चा काढा आमांशावर (अमिबिअसिस ) घ्यवा. 

बेलाच्या मुळाची साल व पानांचा रस हृदयासाठी बल्य व सूज कमी करणारे आहे 
याच्या पानांचा रस सर्दी, खोकला व दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
बेलाच्या पानांच्या रसाने रक्तातली साखर कमी किवा यासाठी रोज बेलाची २ -३ दळे चावून खावीत . 
मूत्र प्रवृत्ती जास्त प्रमाणात होत असल्यास बेलफळ मज्जा ६ग्रॅम  व सुंठी ३ ग्रॅम चा काढा घ्यावा. 



मंत्र: ॐ  उमापुत्राय नमः | बिल्व पत्रं समर्पयामि  ||


 दूर्वा पत्र    (Cynodon dactylon)



संस्कृत नाव- दूर्वा , शतपर्वा 
मराठी नाव- दूर्वा  
हिंदी नाव- दूब 

संपूर्ण भारतभर होणारे, जमिनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप .
याचे  १) श्वेत व  २) नील असे २ प्रकार असतात. त्या पैकी श्वेत दूर्वा औषधात वापरतात. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
दूर्वा चवीला तुरट , गोड व गुणधार्माने शीत ( शरीरातील उष्णता कमी करणारे) द्रव्य आहे. याच कारणाने क्रोधिष्ट गणेशाला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकावर दूर्वा  वाहतात. 
उष्णतेमुळे नाकाचा घोणा फुटल्यास नाकात दुर्वांचा २-२ थेंब रस घालता किंवा खडीसाखर घालून दुर्वांचा रस पिण्यासा देतात .
तापामुळे जेव्हा  अंगाची खुप आग होते तेव्हाही दूर्वा स्वरस खडीसाखारेबर दिल्यास दाह कमी होतो व ताप उतरतो.
पित्तामुळे होणाऱ्या शिरोवेदनेत दुर्वा स्वरस नस्य केल्यास शिरोवेदना कमी होते
त्वचा विकारांवरही दूर्वा उपयोगी थ्रते.
दूर्वा मेध्य (बुद्धिवर्धक) व मनाला शांत करणारी आहे. बुद्धिदात्या गणेशाची ती सर्वात आवडती वनस्पती आहे यात नवल ते काय?
मंत्र: ॐ  गजाननाय नमः | दूर्वा  पत्रं समर्पयामि  ||

No comments:

Post a Comment