Friday, September 18, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - मालती पत्र , भृंगराज पत्र

मालती पत्र (Hiptage madablota)-



संस्कृत नाव- माधवी, भद्रलता  
मराठी नाव- मालती, मधुमालती, हळदवेल 
हिंदी नाव- माधवीलता 

प्रामुख्याने महाराष्ट्रात व  पश्चिम प्रायः  आर्द्र हवामानाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप . थंडीत याला  फुले येतात. फुले सुंदर आकर्षक लाल व पांढ ऱ्या वर्णाची असून सुवासिक असतात.  
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
मालती कडू, तिखट, मधुर व कषाय  रसाचे गुणधार्माने शीत आहे. 
मालती त्रिदोषघ्न विशेषतः पित्तशामक आहे . 
जुनाट चिवट खोकल्या मध्ये याचा उपयोग होतो . याच्या पानांच्या रस दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
शरीराचा दाह   होणे  किंवा  पित्ताचे विकार कमी करणारे औषध . 
पानांचा रस सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
तसेच निरनिराळ्या त्वचा रोगांवर तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोगी. 



मंत्र: ॐ  सुमुखाय  नमः | मालती पत्रं समर्पयामि  ||


भृंगराज पत्र    (Eclipta alba )



संस्कृत नाव- भृंगराज 
मराठी नाव- माका 
हिंदी नाव- भांगरा

भारतात  प्रायः जलाशयाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप .
फुलांवरून याचे  १) श्वेत २) पीत व ३) नील असे प्रकार असतात. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
माका हे तिखट व कडू रसाचे गुणधार्माने उष्ण द्रव्य आहे. 
माका बल्य,  रसायन (वार्धक्य येण्याची गती मंदावणारे ), विषहर वनस्पती आहे. माका केश्य  म्हणजे केशवर्धक व केसांचा रंग व पोत सुधारणारे आहे. तसेच पाचनक्रिया सुधारून यकृताचे काम सुधारणारे आहे. माक्याच्या सेवनाने  पोटाचे व  पित्ताचे विकार कमी होतात. 
माका वातावरचे अत्यंत गुणकारी औषध आहे. माक्याचा रस काढून शरीराला चोळल्यास किंवा बाहेरुन सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
माक्याच्या रसाचे नस्य अर्धशिशी व इतर  प्रकारच्या  शिरोवेदनेवर उपयोगी  पडते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे माका हे बुद्धिवर्धक आहे. १ ग्रॅम माक्याचे चूर्ण, खडीसाखर , तूप व  मध यासाठी नियमितपणे घ्यावे. 
असा हा माका बुद्धिवर्धक व इंद्रियांची शक्ती वाढवणारा असल्यामुळेच कदाचीत बुद्धीदात्या गणेशाला अर्पण करत असावेत. 


मंत्र: ॐ  गणाधिपाय नमः | भृंगराज  पत्रं समर्पयामि  ||

No comments:

Post a Comment