Saturday, September 26, 2015

21 पत्री व त्याचे औषधी गुणधर्म- दाडिम पत्र, देवदारू पत्र, मरु पत्र, अश्वत्थ पत्र

दाडिम पत्र (Punica granatum)

संस्कृत नाव- दाडिम, दन्तबीज, लोहीतपुष्प
मराठी नाव- डाळींब
हिंदी नाव-डाडम

आयुर्वेदोक्त गुणप्रयोग-

आयुर्वेदानुसार  डाळींब पचायला हलके, मधुर-कषाय- अम्ल रसाचे व अनुष्ण आहे. डाळींब त्रिदोषघ्न आहे (मधुर, कषाय म्हणून पित्त व उष्ण म्हणून कफ वात शामक). 

पित्तावर डाळींबाचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
डाळींबाचे  दाणे अग्निवर्धक व रूची उत्पन्न करणारे  आहेत. तापाने किंवा इतर आजाराने तोंडाची चव गेल्यास डाळींबाचे दाणे खावेत. 

अतिसार (diarrhoea) व प्रवाहीका ( dysentery ) वर याची साल व दाणे प्रशस्त ठरतात. जुन्या अतिसारावर ङाळीँबाची साल व  जिरे एकत्र द्यावे.  

कृमि रोगात याच्या मुळांचा काढा देतात. 
कषाय असल्याने याची  साल सूज कमी करणारी व व्रण भरून आणणारी आहे.

डाळींब बुद्धी ला बल देणारे व बुद्धी वर्धक आहे. 

खोकल्यामध्ये डाळींबाचा रस व मध वरचेवर चाटावा. 

स्वर बिघडला असल्यास रोज एक पिकलेले डाळींब खावे.


मंत्र-  ॐ बटवे नमः। दाडिम पत्रं समर्पयामि ।।


देवदारू पत्र (Cedrus deodara)

संस्कृत नाव- देवदारू, भाद्रदारू, सुरभुरुह  (देवतांच्या प्रदेशात हिमालयात  वृक्ष )
मराठी नाव - देवदार
हिंदी नाव - देवदार

याचा खुप उंच वृक्ष असतो ( साधारणतः  २५० फुट किंवा  त्यापेक्षा अधिक उंच )  खोड मोठे , सरळ असते. फांद्या खाली झुकलेल्या व वर निमुळत्या होत गेलेल्या असतात. पत्र सदाहरित व सुचीपर्णी असतात. फल ४-५ इंच लांब व भुरकट रंगाच्या त्रिकोणाकर बिया असतात.

याचे खोड व तेलाचा औषधात उपयोग होतो

आयुर्वेदानुसार देवदारु लघु गुणाचे, कडू रसाचे व उष्ण असल्याने कफ वात शामक आहे.

याच्या लेपाने सुज व वेदना  कमी होते व व्रण भरुन येतात.  तसेच याचा लेप कृमिघ्न ही आहे.

 वातशामक असल्याने देवदारु आभ्यंतर उपयोगाने वेदना कमी करणारे आहे. सांधे दुखणे, अंग मोडणे यावर देवदार १० ग्रॅम घेवुन त्याचा काढा बनवुन घ्यावा. किंवा  देवदाराचे १ ग्रॅम चूर्ण मधाबरोबर सकाळ - संध्याकाळ घ्यावे.

तिक्त (कडू ) असल्याने अग्निवर्धक, पाचक आहे. तसेच  ते कृमिघ्न व वातानुलोमक आहे.

देव दाराचे चूर्ण मधाबरोबर वारंवार चाटल्याने उचकी थांबते.

देवदार रक्तशोधक, हृदयोत्तेजक आहे .  त्यामुळे हृदयरोग , सुज तसेच रक्तविकारांमध्ये देवादार उपयोगी असते. 

देवदारु गर्भाशयाचे शोधन करते . म्हणून प्रसूती नंतर देवदाराचा काढा देतात. 

मंत्र -ॐ सुराग्रजाय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।


मरु पत्र  ( Majorana hortensis  ) 


संस्कृत नाव- मरुवक, खरपत्र
मराठी नाव- मारवा 
हिंदी नाव- मरुआ 
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा  युक्त सुगंधित क्षुप. याचे पंचांग औषधात वापरता 

आयुर्वेदानुसार मारवा  तिखट, कडू उष्ण आहे. हा कफ वाताजन्य विकारांवर उपयुक्त आहे. 
मरवा विषघ्न , जन्तुघ्न, वेदनाहर,  शोथहर,दुर्गंध नाशन,  त्वचेच्या दोषांचे निवारण करणारा  आहे. 
आमवात, संधिवात, दन्तवेदना व व्रणामध्ये मारव्याचा लेप करतात. किंवा त्याची धुरी घेतात.
मारवा  कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारा  ) व उचकी कमी  करणारा  आहे. 
मारव्याच्या पंचागाच्या काढ्याने भूक वाढते, पचन सुधारते. 
मारवा कृमिघ्न व  विषघ्न ही  आहे.
कष्टार्तव  ( dysmenorrhea ) व मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होत असेल तर मारवा उपयोगी होतो. 

मंत्र - ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।



अश्वत्थ पत्र (Ficus religiosa) 


संस्कृत नाव- अश्वत्थ, बोधिद्रु 
मराठी नाव- पिंपळ 
हिंदी नाव- पीपल 

याचा बहु वर्षायु मोठा वृक्षअसतो . याच्या फळ, छाल, श्रृंग व क्षीराचा उपयोग औषध म्हणून करतात.

याचा बहु वर्षायु मोठा वृक्ष असतो . 

भगवान बुद्धाला या झाडाच्या खाली बसून ज्ञान प्राप्त झाले म्हणून याला बोधी वृक्ष म्हणतात. पिंपळ बुद्धी वर्धक आहे.

अश्वत्थ अर्थात पिंपळ कषाय, मधुर व शीत वीर्याचा आहे. हा कफ-पित्त शामक आहे. 

बाह्य उपयोग- वर्ण्य म्हणजे वर्ण सुधारणारा, सुज व वेदना कमी करणारा, व्रण रोपक आहे. 
वर्ण विकारामध्ये अश्वत्थ श्रृंगाचा लेप लावतात. 

आभ्यन्तर उपयोग -
पिंपळ बुद्धी वर्धक आहे.
ज्यांची जिभेवर जड असते त्यांना जेवण पिंपळ पानावर गरमागरम जेवण दिल्याने फायदा होतो असे म्हणतात.

याची छाल रक्त स्राव थांबवण्यासाठी वापरले जाते. 

डाँग्या खोकल्यात याच्या सालीचा काढा देतात. तसेच फळाचे चूर्ण दम्यात देतात. 

गर्भामध्ये स्थापने साठी अश्वत्थ फलाचे चूर्ण दिले जाते. 
मंत्र - हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।

No comments:

Post a Comment