Saturday, March 28, 2020

देवाला काळजी!


मी दवाखान्यात दाखल व्हायचा अवकाश आणि आशा आपल्या नवऱ्याला घेऊन तडक आतमध्येच शिरली. आणि म्हणाली " यांना जरा आधी बघा ना डॉक्टर. "
तसं आल्या आल्याच कोणी कंसल्टींग मध्ये आलं कि कोणत्याही डॉक्टरच्या कपाळावर चार रेघा उमटतातच. पण स्वत:ला आवर घालत मी तिला आणि तिच्या नवऱ्याला बसायला सांगितलं.
" Sorry हो , मध्येच आली. पण मला मालकीणीने फक्त अर्ध्या तासाची सुट्टी दिली आहे. अर्ध्या तासात पुन्हा परत जायला पाहिजे नाहीतर ओरडा पडायचा" असं म्हणून फिदि फिदि हसली.
असंही आशा कधी ही आली कि मी फक्त ऐकायचं हे ठरलेलेच असतं. मला बोलण्याची संधी क्वचितच मिळते. " बरं , बोला. "
" दाखवा हो" तिने नवऱ्याला हुकुम सोडला. आणि पाठी running commentary चालू ठेवली.  तिच्या नवऱ्याने ही लगेच तिची आज्ञा मानली आणि examination table वर चढून लगेच हातापायांचे तळवे दाखवले. आणि माझे डोळे विस्फारले गेले. मी म्हंटलं " बापरे extensive palmo- plantar psoriasis". हो ना skin specialist पण हेच म्हणाले. आशाचं इंग्रजीचं  ज्ञान थोडं बरं होतं.  गेले दिड दोन वर्षं treatment चालू आहे. पण काही फायदा होत नाही. दरवेळी महागडी औषधं देतात. फी घेतात. पण बरं काही वाटत नाही. कंटाळा आला आहे अगदी!  बरं यांचं watchman चं काम. रोज नाईट ड्युटी घेतात आणि दिवसा गाड्या धुतात. तेवढाच हातभार संसाराला. हा असाच आजार घेऊन night ला जातात. त्यांना पायांनी उभं ही रहाता येत नाही कि हातांनी काही काम करता येत नाही.  साबण लागला की त्रास  वाढतो. कसं करायचं. दांडीही मारू शकत नाही. काय करायचं समजत नाही. आत्ता शेवटी तुमच्या कडे घेऊन आले. आत्ता तुम्हीच बघा काय ते. "
तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. कितीही चिंता असली तरी ती बाजूला ठेवून आनंदात कसं रहायचं हे आशा सारख्या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यां कडूनच शिकावं. तिचं आशा हे नाव ती अगदी सार्थ करते. नाहीतर बरेचसे उच्च मध्यमवर्गीय रूग्ण असे बघितले आहेत की त्यांना अतिसुख बोचत असतं...

बऱ्याच वेळाने मला संधी मिळाल्यावर मी तोंड उघडून तिच्या नवऱ्याला गणेशला history विचारली.
Palmo-Plantar psoriasis हा एक अतिशय बरा करण्यास चिवट असा   व्याधी प्रतिकार क्षमता बिघडल्यामुळे होणारा  आजार ( auto-immune disorder) आहे. गणेश च्या हातापायांच्या तळव्यांची  परिस्थिती फारच खराब झाली होती.  तळव्यांना भेगा पडलेल्या होत्या. स्किन फाटली होती. प्रचंड आग होत होती. अधुन मधुन खाज ही होती.

पायावर उभं राहणं शक्य ही नसताना हा माणूस केवळ गरज म्हणून रोज चालत कामाला जात होता आणि रोज night करुन सकाळी त्याच हातांनी गाड्या धुतात होता. किती वेदना होत असतील ! कल्पना न केलेली बरी !!
बरं पथ्य अपथ्य सांगण्याचीही काही सोय नव्हती. कारण जे मिळेल ते काम करणाऱ्या आणि कमावून खाणाऱ्यांना काय पथ्य सांगायचे? आधी वात पित्त प्रकोपाचं कारण असणारी night shift त्याला आधी सोडावी लागली असती.

"खाण्यामध्ये काही पथ्य पाळत नाही पण व्यसन मात्र काही नाही. " इति आशा.
"बरं . व्यसन नाही ही चांगली गोष्ट आहे पण थोडं फार पथ्य मात्र पाळावेच लागेल माझं औषध घ्यायचं असेल तर." मी माझी अट सांगून टाकली.
" तुम्ही सांगा. ते प्रयत्न करतील. पण जमेलच असं काही सांगता येत नाही" आशाचा षटकार.
" अहो ठीक आहे. आंबट, खारट पदार्थ, लोणचं, पापड, आंबवलेले पदार्थ, मासे खाऊ नका. एवढं तरी जमेल ना? जेवणातलं मीठ कमी करा. शक्य तेवढी झोप पुरे होईल असं बघा." मी थोडी वैतागलेच होते. " औषधं देते. वेळेवर घ्या. बरेच दिवस घ्यावी लागतील. लगेच फरक पडणार नाही. कमीत कमी सहा महीने तरी." मी आधीच सांगून टाकले.
"हो , औषध घेतील ते. पण एक request आहे" आशाचा आवाज पहिल्यांदाच थोडा ओशाळला. "डॉक्टर पैशांची थोडी अडचण आहे. लगेच नाही देता येणार. जमेल तसे देईन." आशा थोडी उदास झाली. तिचे डोळे पाणावले.
"मी कुठे मागते तुमच्या कडे पैसे? सवड मिळेल तसे द्या. नाही दिलेत तरी चालेल. पण औषध थांबवु नका. चालू ठेवा. " तिने कृतज्ञतेने बघितलं, आणि ती म्हणाली," देवाला काळजी". तिच्या खांद्यावर मी थोपटलं आणि कंसल्टींग मधल्या धन्वंतरीच्या फोटो कडे बोट दाखवून म्हंटलं " होतील ते बरे. काळजी करू नका. "
धन्वंतरीचं नाव घेतले आणि आयुर्वेदिक औषधे दिली. काही गोळ्या ,काढे आणि औषधी तूप. पथ्य पुन्हा समजावून सांगितले.
नंतर जवळ जवळ आठ नऊ महिने त्यांची treatment चालू होती.
 त्यांना बरं वाटतं होतं. आणि आशा आणि गणेश अचानक गायब झाले. साधारण पणे दोन वर्षांनी ते पुन्हा आले. तोच अवतार. आजही ती पुढे आणि पाठीमागून नवरा येऊन गपगुमान उभा राहिला.
मधल्या काळात मला काहीच पत्ता नव्हता कि गणेशला कसं आहे. एखाद्या पेशंटला बरं वाटत असताना त्याने follow up सोडला कि डॉक्टर ला फार त्रास होतो.
त्या दोघांना पुन्हा बघितल्यावर मला भीती वाटली, पुन्हा तर palmo-plantar psoriasis नाही ना?
तेवढ्यात आशा पूर्वी सारख्याच आवेशात म्हणाली " पुर्वीचं काही नाही हो आत्ता !! आत्ता गुडघा दुखतोय त्यांचा उजवा.  गाडी पुसायला वर चढावं लागतं ना !.... " तिचंच निदान आणि....
मी हात जोडले आणि सुटकेचा निःश्वास टाकला. आणि खरंच देवाचे आभार मानले की फार पथ्य पाणी न करता palmo-plantar psoriasis औषधांनी बरा झाला होता. त्याने पुन्हा वर डोकं काढलं नव्हतं !

खरं आहे, म्हणतात ना .. देवाला काळजी!!


२८/०३/२०२०