Wednesday, September 23, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बृहती पत्र, अर्क पत्र


बृहती पत्र (Solanum indicum)




संस्कृत नाव - बृहती, क्षुद्र भण्टाकी (वांग्याप्रमाणे छोटे क्षुप)
मराठी नाव- डोरली
हिन्दी नाव- बडी कटेरी, बनभंटा
याचे प्राय: सर्वत्र होणारे, ३ ते ६ फूट उंचीचे छोटे क्षुप असते. काण्ड व पानांवर काटे असतात. पाने ३ ते ६ इंचाची खण्डीत व रोम युक्त असते. याला निळसर -जांभळ्या रंगाची फुले येतात. फळ छोटे गोलाकार, रेखांकीत, कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळे होते.
दशमुळातील १० औषधांपैकी एक औषध.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे बृहती तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची आहे. उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते.
वेदना युक्त अवयवांवर बृहतीफल, ह्ळद व दारूहळदीचा लेप लावतात.
त्वचेच्या विकारांवर उपयुक्त. कण्डूघ्न म्हणजे खाज कमी करणारे आहे. चाई (एलोपेशिया) या विकारावर याचा रस डोक्यावर लावतात.
पाचन संस्थेच्या विकारांमध्ये जसे भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, अपचन व कृमिं वर याचा उपयोग करतात.
हृदय दौर्बल्य व त्यामुळे येणारी सूज यातही उपयोगी पडते. इतर रक्तज विकारांवरही बृहतीचा उपयोग होतो.
कष्टार्तव किवा dysmenorrhea वर बृहती व बृहती असलेल्या दशमुलारिष्टाचा चांगला उपयोग होतो.
सर्दी, खोकला, दम्या मध्येही उपयुक्त असते. वैद्यांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करावा .

मंत्र - ॐ एकदंताय  नमः। बृहती पत्रं समर्पयामि ।।
 
अर्क पत्र ( Calotropis procera)











संस्कृत नाव - अर्क ( सुर्याप्रमाणे तिक्ष्ण व उष्ण), तूलफल (रूईदार फळ असलेले)
मराठी नाव- रूई
हिंदी नाव- आक, मदार
६ ते ८ फूट उंचीचे क्षुप. याचे कांड (खोड) कठीण, पाने मोठी, आयताकार असून त्यांचा खालील भाग रोमयुक्त असतो. फुले सुगधित, श्वेत वर्णाची वरती बैंगनी रंगाचे ठीपके असलेली असतात. फळे लंबगोल किंवा वेडीवाकडी असतात. सुकल्यावर ती फूटून त्यातून रूई बाहेर पडते.
आयुर्वेदाच्या मताप्रमाणे रुई  तिखट, कडू रसाची व उष्ण वीर्याची वनस्पती आहे.
उष्ण असल्यामुळे ती कफ- वात शामक असते. रक्तार्क पुष्प मधुर व कडू रसाचे असल्याने कफ -पित्त शामक आहे.

रुई बाहेरून लावल्यास वेदना व सूज कमी करणारे, जंतुघ्न, व्रणशोधक आहे.
आमवात व संधिवातावर दुखऱ्या सांध्यावर रुईची पाने तेलावर गरम करून बांधावीत.

त्वचाविकारांवरील हे उत्तम औषध आहे. त्वचारोगांवर रूइचे दूध, राईच्या  तेलातून लावतात.
श्वित्र म्हणजे ल्युकोडर्मा वर अर्काक्षीराचा लेप करतात. 

पोटाच्या अनेक विकारांवर  (यकृताचे आजार,  भूक न लागणे, तोंडाची चव जाणे, पोट फुगणे अपचन व कृमिं ) रूईच्या मुळाच्या सालीचा उपयोग करतात.

श्लीपद  किंवा हत्तिरोगावरही मुळाची साल देतात. 

खोकला असताना कफ सुटण्याससाठी रुईच्या मुळांचा काढा देतात. 

रुई हे आयुर्वेदातील अतिशय गुणकारी औषध आहे. पण ते अतिशय तीक्ष्ण -उष्ण असल्याने त्याचा वापर जपून व वैद्यकीय सल्ल्यानेच करावा

मंत्र - ॐ कपिलाय नमः। अर्क पत्रं समर्पयामि ।।


No comments:

Post a Comment